
प्रतिनिधी/रुपेश सलामे
मुरूमगाव – मुरूमगाव येथे जनसंवाद यात्रे दरम्यान मुरूमगाव वासियांनी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत आपल्या विविध नागरी व विकासात्मक समस्यांचा पाढा वाचला. यावेळी मुरूमगाव वासियांच्या वतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदन माजी आमदार डॉ. होळी यांना सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये प्रामुख्याने मुरूमगाव येथे सार्वजनिक क्रीडा मैदानासाठी सामूहिक वनपट्टा मंजूर करण्यात यावा, ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात यावे, को-ऑपरेटिव्ह बँक स्थापन करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच गड माता मंदिरासाठी सभागृह व बोरवेल मंजूर करणे, ठाकुरदेव येथे तारेचे कुंपण उभारणे, मुरूमगावमध्ये सीसी रोडचे बांधकाम करणे या मागण्यांचा समावेश होता.

याशिवाय मुरूमगाव ते अल्कन्हार–औंधी रस्त्याचे खडीकरण करून डांबरीकरण करणे, मुरूमगाव येथील वाचनालयासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, मुरूमगाव ते गडचिरोली मार्गावर जादा बससेवेची व्यवस्था करणे, तसेच १०,००० क्षमतेचे गोदाम मंजूर करण्यात यावे अशा महत्त्वाच्या मागण्याही ग्रामस्थांनी मांडल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सर्व मागण्या रास्त असून त्याबाबत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून ठोस पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही दिली. तसेच ग्रामस्थांनी एकजुटीने विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी निवेदन देतांना माजी जिल्हा परिषद सदस्या लता पुंगाटी, वसंत कोलीयरा, अजमन रावटे, निखिल मेश्राम, राजेश राऊत, युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष राजेंद्र कोठवार, खुशवंतशहा मडावी, ओंकार कोटपरिया, ध्रुवशहा मडावी, नंदकिशोर नैताम, महेश दुग्गा, मिलिंद कोवे, प्रवीण होळी, विजय टेकाम, सचिन भालेकर, दीपक रगडे, रिंकू सोनी, महेंद्र पिद्दा, मुकेश कोलियारा, जीवन गावर्णा, गौतम राणा, फिरोज कोमा आदी नागरिक उपस्थित होते.

