
प्रतिनिधी/रुपेश सलामे
आरमोरी :- तहसील कार्यालय, आरमोरी येथे माननीय आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रकल्पाशी संबंधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सविस्तर बैठक घेण्यात आली. रेल्वे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा योग्य तो वाढीव मोबदला मिळावा तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे, ही प्रमुख मागणी या बैठकीत शेतकऱ्यांच्या वतीने मांडण्यात आली.
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी मोबदला निश्चिती, जमिनीचे मोजमाप, कागदपत्रांची पूर्तता तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब यासंदर्भातील अडचणी सविस्तरपणे मांडल्या. यावर मा. प्रधान साहेब, उपविभागीय अधिकारी (SDM) देसाईगंज (वडसा) यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत नियमांनुसार योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच मा. चौधरी मॅडम, तहसीलदार आरमोरी यांनी प्रशासनामार्फत आवश्यक ती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार रामदासजी मसराम यांनी विकास प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च असले पाहिजे, असे स्पष्ट केले. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत योग्य मोबदला व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळेपर्यंत आपण सातत्याने पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. या बैठकीस महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या प्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, धनपाल मिसार सर, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष दिलीप घोडाम, कवडू शहारे उपस्थित होते.

