
युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन; आठवडाभरात कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा…
जिल्हा प्रतिनिधी !
मुल : मुल तालुक्यातील शासकीय, अनुदानित तसेच इतर सर्व शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधांची प्रत्यक्ष तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल जनतेसमोर प्रसिद्ध करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तालुक्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी पालक व नागरिकांकडून समोर येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांची स्थिती, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, शैक्षणिक साहित्य, शिक्षकांची उपस्थिती, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शैक्षणिक प्रगती यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच शाळांमधील संगणक, वीज, इंटरनेट व इतर शैक्षणिक साधनांची उपलब्धता, मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर तसेच विविध शासकीय योजनांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळतो की नाही, याचीही पडताळणी करण्याची मागणी युवक काँग्रेसने केली आहे.
तपासणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी व कमतरतांवर तातडीने उपाययोजना करून त्याचा सविस्तर अहवाल जनतेसमोर जाहीर करावा. तसेच कोणतीही अनियमितता किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीची एका आठवड्याच्या आत दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हितासाठी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच गरज पडल्यास आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशाराही युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदन देताना तालुकाध्यक्ष गुरुदास गुरनुले, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार, इंटक जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय समर्थ, जिल्हा उपाध्यक्ष चेतन कामडे,शहराध्यक्ष मिथुन सिंग पटवा, अनुसूचित जाती कार्याध्यक्ष आकाश दहिवले, संदीप चिंचोलकर, लहू कडस्कर, भास्कर खोब्रागडे,रवि तेलसे तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
📝..Chetan Kamde News Jagar..

