
प्रतिनिधी/रुपेश सलामे
कूरखेडा : मागील दीड वर्षांपासून कूरखेडा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तसेच सती नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र या कामात मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा, नियोजनाचा अभाव व अनियमितता दिसून येत असून काम रखडल्याने आणि सर्वत्र धूळ उडत असल्यामुळे शहरवासीयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत आमदार रामदासजी मसराम यांनी आज राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित रस्ता व पुलाच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान बांधकामातील अनियमितता, निकृष्ट दर्जा व नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना जाब विचारत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

कूरखेडा–वडसा मार्गावरील विद्यानगर ते जांभूळखेडा या सुमारे चार किलोमीटर अंतरावरील रस्ता रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम तसेच सती नदीवरील मोठा पूल व इतर लहान पुलांचे बांधकाम एका कंत्राटदार कंपनीकडे देण्यात आले आहे. मागील दीड वर्षांपासून हे काम सुरू असले तरी योग्य नियोजनाअभावी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी जुना डांबरी रस्ता खोदून ठेवण्यात आला असून, काही ठिकाणी केवळ गिट्टी व दगड टाकून काम वर्षभरापासून प्रलंबित आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही भागात सिमेंट काँक्रीटचा पहिला थर टाकण्यात आला असला तरी योग्य पद्धतीने पाणी मारून प्रक्रिया न केल्यामुळे सिमेंट व वाळूची धूळ मोठ्या प्रमाणात उडत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारांचे बांधकाम करण्यात आले असले तरी ते अर्धवट व तुटक स्वरूपाचे असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी अनेक ठिकाणी पाणी साचून डबकी निर्माण झाली होती. निकृष्ट दर्जामुळे काही गटारांना तडे गेल्याचेही आढळून आले आहे.
मागील पावसाळ्यात गोठणगाव नाका ते जांभूळखेडा या मार्गावर दोन्ही बाजूंनी रस्ता खोदल्यामुळे जड वाहने अडकून वाहतूक वारंवार ठप्प होत होती. अद्यापही या भागातील काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरातून देसाईगंजकडे जाणारा मार्ग खोदण्यात आल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली आहे.
या प्रसंगी : माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, धनपाल मिसार सर ,जयंत हरडे, माजी सभापती गिरीधर तीताराम, माजी नगरसेवक उस्मान पठाण, पुंडलिक निपाने, जांभूळकर साहेब,शिराज पठाण,भावेश मुंगणकर, युवक काँ अध्यक्ष कुरखेडा प्रांजल धाबेकर, नाजूक दखणे तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता केळकर, उपविभागीय अभियंता लिंगावर, कनिष्ठ अभियंता अमित रामटेके, कंत्राटदार कंपनीचे मुख्य व्यवस्थापक राजेश तिनखेडे, प्रकल्प संचालक संदीप भैसारे, स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. आमदार रामदासजी मसराम यांनी रखडलेले काम तातडीने पूर्ण करून दर्जेदार बांधकाम करावे व नागरिकांना होणारा त्रास त्वरित थांबवावा, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना दिले.

