
प्रतिनिधी/ नंदकिशोर वैरागडे
कोरची :- जानेवारी महिन्यात थंडीच्या सुरूवातीला कोरची शहरातील मुख्य रस्ता पुर्णपणे उकडलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे धुळीचे कण आकाशात उडून प्रदुषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत की, आता हिवाळ्यात अशी अवस्था आहे तर उन्हाळ्यात काय होईल? नगरपंचायत प्रशासन मात्र या मुद्यावर पूर्णपणे गप्प बसले आहे. ही समस्या आता शहरातील मोठी चर्चा झाली आहे. आणि रहिवासी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तिव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
कोरची हे गडचिरोली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण आहे. जिथे दैनंदिन वाहतूकीसाठी मुख्य रस्ता हा जीवनरेखा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हा रस्ता पुर्णपणे उखडला आहे. वाहनांच्या येण्या- जाण्याने धुळ उडते आणि ती हवेत मिसळून प्रदुषण वाढवते. स्थानिक रहिवासी सांगतात की, धुळीमुळे स्वास घेणेही कठीण झाले आहे. लहान मुले आणि वृद्धांना याचा त्रास होतो आहे. जानेवारी मध्ये असे असेल तर एप्रिल- मे महिन्यात काय होईल?
रस्ता तयार करण्यासाठी गावकऱ्यांनी नगरपंचायत ला निवेदन दिले, 23 सप्टेंबर ला मोर्चा काढला. दिवाळी संपताच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन सीओ गणेश सोनवणी यांनी दिले होते. अजूनपर्यंत काहीही झाले नाही.
प्रदुषण हे आरोग्यासाठी घातक आहे. हवेची गुणवत्ता खराब होत चालली आहे.नोव्हेंबर महिन्यात कोरची शहरातील प्रदुषण 301-400+ एक्युआय आहे.जी अत्यंत खराब स्थिती आहे.0-50 एक्युआय असल्यास चांगली स्थिती असते,51-100 असल्यास समाधानकारक, 101-200 असल्यास मध्यम स्थिती,201-300 असल्यास खराब स्थिती, 301-400 असल्यास अत्यंत खराब स्थिती तर 401-500+ धोकादायक स्थिती असते. या प्रदुषणामुळे स्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता आहे. कोरची तील डॉक्टर सुध्दा चिंता व्यक्त करीत आहेत. एका डॉक्टरांने सांगितले की धुळीमुळे अॅलर्जी आणि दम्याचे रूग्ण वाढत आहेत. प्रशासनाने वेळीच पावले उचलली पाहिजेत.
नगरपंचायत प्रशासनाकडून मात्र कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही. नगरपंचायत प्रशासन म्हणतो, रस्त्याचे बांधकाम करायला पैसे नाहीत. तर मग आवश्यकता नाही त्याठिकाणी बांधकाम करायला पैसा आला कुठून असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

