
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीक विकासासाठी व जिल्ह्यातील मूलभूत समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या उद्देशाने गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी दि. 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनापासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ‘जनसंवाद’ कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.
या जनसंवाद कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध पक्षातील आजी – माजी लोकप्रतिनिधी, नागरिक, युवा वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, विविध स्वयंसेवी संस्था (NGO) यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून जिल्हा विकासाशी संबंधित प्रश्न, गावपातळीवरील समस्या, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणीपुरवठा, रोजगार, आदिवासी विकास, वनहक्क, दळणवळण व दळणवळणाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या अडचणी याबाबतची लेखी निवेदने स्वीकारली जाणार आहेत.
प्राप्त सूचनांवर आधारित माजी आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत सखोल चर्चा करून गडचिरोली जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात तात्काळ सोडविण्यायोग्य मूलभूत समस्या तसेच दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने आवश्यक योजना व उपाययोजना यांचा समावेश राहणार आहे.

तयार करण्यात आलेल्या जिल्हा विकास आराखड्याच्या आधारे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन जिल्ह्याच्या प्रश्नांवर व्यापक स्वरूपात चर्चा करण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी शासनस्तरावर सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात मुलचेरा व एटापल्ली तालुक्यांपासून होणार असून जिल्ह्यातील सर्व घटकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन माजी आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.

