
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
चमचागिरीवर चाललेल्या राजकारणामुळे काँग्रेसचा दारुण पराभव; निष्ठावानांना डावलल्याने जनतेचा उद्रेक, पिंकू बावणेंना थेट कौल
देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसला आलेले दारुण अपयश हे भाजपच्या ताकदीमुळे नव्हे, तर काँग्रेसमधील स्वघोषित गुरुजी गटाच्या सत्तालोलुप, अहंकारी व जनतेपासून तुटलेल्या अपयशी कार्यपद्धतीमुळे झाल्याचे आता उघडपणे समोर आले आहे. या निवडणुकीत जनतेने केवळ उमेदवार नव्हे, तर चमचागिरी, निष्ठावानांची उपेक्षा आणि अपयशी नेतृत्वालाच ठाम नकार दिला आहे.

विधानसभा व लोकसभा निवडणुकांत यश मिळूनही देसाईगंज शहराचा विकास पूर्णतः ठप्प राहिला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, मूलभूत सुविधा आणि रोजगार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. निधी उपलब्ध असूनही कामे कागदावरच अडकून राहिली. लोकसभा विजयी उमेदवार शहरात फिरकले नाहीत, तर विधानसभा स्तरावर फक्त २–४ चमच्यांना सोबत घेऊन फोटोसेशन आणि दिखाऊ भेटी एवढाच कारभार सुरू राहिला. यामुळे “आमच्यासाठी कोणीच नाही” अशी भावना जनतेमध्ये खोलवर रुजली.
तिकीट वाटपात घोर अन्याय : शहरातील अनुभवी कार्यकर्ते डावलले
नगरपरिषद निवडणुकीतील सर्वात मोठा संतापाचा मुद्दा ठरला तो तिकीट वाटप. शहरात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या, अनुभवी व निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून ग्रामीण भागातील काही चमच्यांच्या सांगण्यावरून अनुभव नसलेल्या व्यक्तींना तिकीट देण्यात आले. हा निर्णय पूर्णतः गुरुजी गटाच्या बंद खोलीतील, चमचागिरीवर आधारित राजकारणाचा परिणाम असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी उघडपणे केला.
या चुकीच्या निर्णयाचा फटका संपूर्ण शहरात बसला. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढासळला, संघटन विस्कळीत झाले आणि त्याचा थेट परिणाम मतपेटीतून समोर आला. अखेर, ज्या जाळ्यात इतरांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याच जाळ्यात गुरुजी गट स्वतःच अडकला.
पिंकू बावणे : निष्ठेचा विजय, चमच्यांचा पराभव
गेल्या १० वर्षांहून अधिक काळ कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजसेवा, पक्षसंघटन आणि सामान्य जनतेसाठी झटणारे पिंकू बावणे यांना काँग्रेसकडून सातत्याने डावलण्यात आले. निष्ठा असूनही संधी नाकारण्यात आली. अखेर, २०० हून अधिक युवकांसह त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
पैशाचे प्रलोभन, दिग्गजांची फौज, दबावतंत्र—सर्व प्रयत्न निष्फळ ठरवत जनतेने थेट कौल दिला. हा विजय केवळ व्यक्तीचा नसून निष्ठेचा, प्रामाणिक कामाचा आणि जनतेशी थेट जोडलेल्या नेतृत्वाचा असल्याची भावना मतदारांमध्ये स्पष्टपणे दिसून आली.
जिल्हा परिषदेसाठी इशारा : जनता पुन्हा धडा शिकवणार
देसाईगंज नगरपरिषद निकाल हा आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी स्पष्ट इशारा मानला जात आहे.
निष्ठावानांना डावलले, चमच्यांना वरचढी दिली आणि जनतेकडे दुर्लक्ष केले, तर जनता पुन्हा चमच्यांना आणि त्यांचे पाठीराखे गटांना धडा शिकवायला सज्ज असल्याचा ठाम संदेश या निवडणुकीतून मिळाला आहे.

