
गडचिरोली : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ अंतर्गत थेट अध्यक्ष व नगरसेवक सदस्य पदाच्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ही मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता शासकीय कृषी महाविद्यालय, चंद्रपुर रोड, गडचिरोली येथे सुरू होणार आहे.
मतमोजणीसाठी एकूण ७ टेबल्स लावण्यात आले असून, नगरपरिषद क्षेत्रातील १३ प्रभागांसाठी टप्प्याटप्प्याने मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक फेरीत दोन प्रभागांची मतमोजणी केली जाणार असून, एकूण सात फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक १ व २, दुसऱ्या फेरीत ३ व ४, तिसऱ्या फेरीत ५ व ६, चौथ्या फेरीत ७ व ८, पाचव्या फेरीत ९ व १०, सहाव्या फेरीत ११ व १२ तर सातव्या फेरीत प्रभाग क्रमांक १३ ची मतमोजणी पूर्ण होणार आहे. याच सातही फेऱ्यांमधून अध्यक्ष पदाच्या मतमोजणीची कार्यवाहीदेखील पार पाडली जाणार आहे. पोस्टल बॅलेटसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना, अध्यक्ष पदासाठी प्रत्येकी ७ तर सदस्य पदासाठी नेमणूक केलेल्या प्रतिनिधींना, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे.

मतमोजणीच्या दिवशी शासकीय कृषी महाविद्यालय, चंद्रपुर रोड परिसरातील वाहतुकीवर निर्बंध राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चंद्रपुर मार्गे येणाऱ्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात, गांधी चौक मार्गे येणाऱ्यांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात, गोकुलनगर बायपास मार्गे येणाऱ्यांसाठी देवकुळे पटांगणात तर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कृषी कार्यालय, चंद्रपुर रोड येथील मैदानात वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मतमोजणीदरम्यान सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व नागरिकांनी शांतता व शिस्त राखावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी आणि सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सूर्यकांत पिदुरकर तसेच पोलीस निरीक्षक श्री. विनोद चव्हाण (पोलीस स्टेशन, गडचिरोली) यांनी केले आहे.

