
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे. त्यातील गडचिरोली (Gadchiroli) नगरपरिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गडचिरोली नगरपरिषदेत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे. विकासाचे मुद्दे पुढे करत उमेदवार प्रचार करतायत. त्यामुळे जनता कुणाला साथ देतेय पाहावं लागणार आहे.
गडचिरोलीतील नगर परिषद निवडणुकीने सर्वांचं लक्ष वेधलय. अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. गडचिरोली नगराध्यक्ष पदावरून सर्वच पक्षात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली. सर्वांसमोर बंडखोरांचं आव्हान होतं. मात्र अनेकांनी माघार घेतल्याने बंडखोरीचा धोका टळला. मात्र आता गडचिरोली नगरपरिषदेत महायुतीतील घटकपक्षांमध्ये मुख्य लढत होणार आहे. भाजपने नुकतंच प्रवेश केलेल्या प्रणोती निंबोरकर यांना उमेदवारी दिलीये. तर राष्ट्रवादी काँग्रेसने अश्विनी खोब्रागडे यांना पाठिंबा दिलाय. तर सहपालकमंत्री अॅड. आशिष जैस्वाल यांनी राष्ट्र्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय.तर काँग्रेसनंही कविता पोरेड्डीवार यांना रिंगणात उतरवलंय. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याचं भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारानं म्हटलंय.
नाले निर्मिती, स्वच्छता, वाढती लोकसंख्या, आरोग्याच्या सोयी आणि शहरी आवास योजनेची अंमलबजावणी असे अनेक मुद्दे उमेदवारांकडून समोर आणले जातायत. मात्र जनता एका अनुभवी उमेदवारालाच निवडून देईल असा विश्वास काँग्रेस उमेदवार कविता यांनी व्यक्त केलाय.

मतदानाला काहीच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय. भाजप आणि राष्ट्रवादीनं युवा चेहरे रिंगणात उतरवलेत. तर काँग्रेसनं एक अनुभवी उमेदवार दिलाय. त्यामुळे गडचिरोलीची जनता कुणाला कौल देतेय. आणि गडचिरोली नगरपरिषदेवर कुणाची सत्ता येणार हे जनता 2 डिसेंबरलाच ठरवेल.

