
जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून रेकॉर्डिंग व्हायरल, उमेदवार जेसा मोटवानींविरुध्द पोलिसांत तक्रार.
वडसा – नगर परीषदेच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्या संवादाचे रेकॉर्डिंग व्हायरल केल्याचा प्रकार देसाईगंजात घडला आहे. याबाबत देसाईगंज नगर परीषदेचे उमेदवार तसेच काॅंग्रेस सोडून राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट) चे जेसा मोटवानी यांच्याविरुद्ध तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी देसाईगंज ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जेसा मोटवानी हे देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष असून नगर परीषद निवडणुकीच्या प्रारंभीच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत (अजित पवारग गट) प्रवेश केला. ते देसाईगंज येथे प्रभाग क्र. ५ अ मधून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून ३२ मिनिटांनी त्यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना मोबाइलवर संपर्क केला. यात त्यांनी शहरातील जागेच्या पट्ट्याविषयीचा प्रश्न विचारला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील संचिका उपविभागीय अधिकाऱ्यांकडे असून दोन दिवसांत प्रश्न मार्गी लागेल, असे सांगितले.

या संभाषणाची मोटवानी यांनी रेकॉर्डिंग केली. त्यानंतर समाजाच्या व्हॉटस्अप ग्रुपवर ती रेकाॅर्डिंग शेअर केली. ही बाब निदर्शनास आल्यावर तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी शुक्रवार (ता. २१) यातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा तसेच प्रलोभन देऊन मते मागण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा नोंदवावा, असे पत्र देसाईगंज पोलिसांना दिले. पोलिसांनी यासंदर्भात मोटवानी यांना नोटीस बजावली असून यानंतर असा काही प्रकार केल्यास गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी तंबी दिली आहे. त्यामुळे मोटवानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डुडुलकर म्हणाल्या की, व्हॉटसअप चॅटींग, रेकॉर्डिंगच्या पुराव्यासह देसाईगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी पुढील कारवाई करणे आवश्यक आहे.
“जिल्हाधिकाऱ्यांसोबतचे माझे संभाषण सोशल मीडियात कोणी व्हायरल केले माहीत नाही. याबाबत तहसीलदारांनी तक्रार दिली असेल, तर त्याचीही मला माहिती नाही.”
– जेसा मोटवानी, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार, देसाईगंज

