
गडचिरोली – आरमोरी तालुक्यातील देऊळगाव बुट्टी येथे एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाने हल्ला करून दोन वृद्ध महिलांना ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुक्ताबाई नेवारे (७०) आणि अनुसया जिंदर वाघ (७०) अशी मृत महिलांची नावे आहेत.
दोघीही सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. बुधवारी रात्रीच्या सुमारास एकाच परिसरात दोघींचे मृतदेह आढळून आले. यामुळे वडधा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुक्ताबाई नेवारे या बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी गावापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. तिथे वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. अनुसया जिंदर वाघ या १२ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. बुधवारी रात्री गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गालगतच्या कांडेश्वर पहाडीजवळ उग्र वास येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर परिसरात शोधमोहीम राबवली.

रात्री आठ वाजेच्या सुमारास याच ठिकाणी अनुसया जिंदर वाघ यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या जवळच मुक्ताबाई नेवारे यांचाही मृतदेह पडून होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. देऊळगावचे पोलीस पाटील मिथून कांदोळ यांनी तत्काळ घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
वाघासह गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींनी घातलेल्या धुमाकूळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सोबतच काहींना जीवही गमवावा लागला. मात्र प्रशासनाला अजूनही हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यश आलेले नाही. हत्तींना पळवून लावण्यासाठी कुशल मनुष्यबळ आणि साहित्य वन विभागाकडे नसल्याने ऐनवेळी त्यांचीही तारांबळ उडत असते. त्यामुळे शासनाने आवश्यक उपाययोजना करून वन्य प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी नागरिकांनी केली आहे..

