
-शिवसेना शिक्षक आघाडी व कंत्राटी शिक्षकांची CEO कडे मागणी
गडचिरोली : पेसा क्षेत्रात नियुक्ती मिळालेल्या कंत्राटी शिक्षकांना शैक्षणिक सत्र 2024-25 पासून, विशेषतः मार्च महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. या थकबाकीमुळे शिक्षक वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांमधील पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षक व शिवसेना शिक्षक आघाडी ने एकत्र येत गडचिरोली जि. प. CEO सुहास गाडे यांना निवेदन सादर केले. यावेळी शिक्षकांनी आपली वेदना व अडचणी स्पष्टपणे मांडल्या. “महागाई वाढली, घर चालवणे अवघड झाले, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही होत नाही” अशी व्यथा अनेक शिक्षकांनी मांडली.

शिक्षकांनी शासनाकडे मागणी केली की, तात्काळ थकबाकी मानधनाचा निकाल लावून पुढे वेळेवर मानधन देण्यात यावे. अन्यथा त्यांना टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
या निवेदनावेळी शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण अलामे, छात्रभारती संघटनेचे माजी राज्य उपाध्यक्ष उमेश उईके, आरमोरी विधानसभा सभा क्षेत्र प्रमुख नारायण धकाते, प्राजक्ता मेश्राम, अरविंद शेडमाके सर, सुरज मडावी, निलेश आत्राम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

