योगेश रामटेके, सावली
सावली :- सावली वनपरिक्षेत्रात गेले अनेक वर्षापासून विविध कामाला रोजंदारीवर जवळपास १५० ते २०० मजूर काम करीत आहेत. त्या मजुरांना २०२४ पर्यंत वेळेवर मासिक वेतन दिले जात होते. मात्र मागील सहा महिन्यापासून रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे वेतन झाले नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी निर्माण झाली आहे.
सावली वनपरिक्षेत्रात सावली, पाथरी, व्याहाड (खुर्द) असे क्षेत्रीय कार्यालय असून त्या अंतर्गत वन बिट क्षेत्र कार्यरत आहेत. त्या-त्या कार्यक्षेत्रात जंगल परिसरातील विविध कामे करण्यासाठी वनविभागाकडे अनेक वर्षापासून शेकडो मजूर रोजंदारीवर काम करीत आहेत. त्या मजुरांना २०२४ पर्यंत वेळेवर महिन्यात वेतन दिले जात होते. मात्र मागील सहा महिन्यांपासून वेतनापासून वंचित झाले आहेत. त्यामुळे मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी निर्माण झाली आहे. या संदर्भात वनविभागाने रोजंदाराची समस्या मार्गी लावण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने मजुरांचे वेतन थांबले आहे अशी माहिती पुढे येत आहे. या संदर्भात वनमजूर संघटना वारंवार शासन प्रशासन व अधिकाऱ्यांकडे मागणी रेटून धरली असून दिवाळी पूर्वी वन मजुरांचे वेतन द्यावे, अशी मागणी रोजंदारी वनमजूर करीत आहेत.
