
अमरावती – अमरावतीतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी थकीत मानधनाच्या विरोधात पुकारलेल्या संपामुळे रुग्णसेवा पूर्णतः ठप्प झाली असून, ११ किडनी ट्रान्सप्लांटसह अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.
अमरावती शहर (जिल्हा) युवक काँग्रेसने या बाबत तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. सुमारे ९ कोटी रुपयांचे मानधन गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असल्याने, हॉस्पिटलमधील ६५ डॉक्टरांनी संप पुकारल्याची माहिती युवक काँग्रेसने दिली. डॉक्टरांच्या संपामुळे गंभीर आजारी रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हॉस्पिटलमधील सेवा ठप्प झाल्याने अनेक रुग्णांचे प्राण धोक्यात आले आहेत. युवक काँग्रेसने हेही अधोरेखित केले की, या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. उलट, पालकमंत्री उडवाउडवीची उत्तरे देत जबाबदारी झटकत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.जर ही मागणी तातडीने मान्य झाली नाही, तर युवक काँग्रेस रुग्णांचे व सामान्य नागरिकांचे नेतृत्व करून रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

