
जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेऊन निवेदन सादर
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी:-गडचिरोली जिल्ह्यातील युवकांच्या जिद्द, धाडस आणि साहसी वृत्तीला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आलापल्ली येथून हाती घेण्यात आला आहे. वैभव ज्योती विजय कोमलवार यांनी आलापल्ली ते लेह-लडाख असा सोलो बाइक राइडचा संकल्प केला असून, या साहसी प्रवासात तब्बल १९,०२४ फूट उंचीवरील उमलिंग-ला गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या साहसी उपक्रमासंदर्भात आज गडचिरोली येथे जिल्हाधिकारी श्री. अविष्यांत पंडा साहेब, पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश साहेब तसेच माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी या महत्त्वाकांक्षी सोलो बाइक प्रवासाची माहिती देण्यात आली. या उपक्रमासाठी संबंधित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
गडचिरोलीचे नाव देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न
हा प्रवास केवळ वैयक्तिक साहस किंवा स्वप्नपूर्तीसाठी नसून गडचिरोली जिल्ह्याचे नाव देशभर पोहोचविणे, तसेच जिल्ह्यातील युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने पुढे जाण्याची प्रेरणा देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे वैभव कोमलवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील युवकांमध्येही मोठी क्षमता असून, योग्य ध्येय निश्चित करून मेहनत आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास कठीण वाटणारी उद्दिष्टेही गाठता येतात, असा संदेश या साहसी प्रवासातून देण्याचा प्रयत्न आहे.
१६ गडकिल्ल्यांची पवित्र माती आणि जल घेऊन जाणार
या सोलो बाइक प्रवासाचे विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या १६ गडकिल्ल्यांची पवित्र माती आणि १६ गडकिल्ल्यांचे पाणी एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारण्यात आली आहे. ही मूर्ती आपल्या साहसी प्रवासाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून उमलिंग-ला येथे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि जिद्दीपासून प्रेरणा घेत हा प्रवास पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, त्यांच्या ऐतिहासिक वारशाला आगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
१५ ते २० दिवसांत ५ हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर
नियोजित वेळापत्रकानुसार हा संपूर्ण सोलो बाइक प्रवास २१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्याचे नियोजन आहे. या कालावधीत ५ हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर मोटरसायकलवरून पार करण्याचा संकल्प आहे.आलापल्लीपासून सुरू होणारा हा प्रवास विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत लेह-लडाखच्या अत्यंत उंच पर्वतीय भागात पोहोचणार आहे. उंची, कमी तापमान, बदलते हवामान आणि आव्हानात्मक रस्ते यामुळे या प्रवासासमोर अनेक आव्हाने असणार आहेत.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून शुभेच्छा
या उपक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. अविष्यांत पंडा साहेब आणि पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश साहेब यांची गडचिरोली येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले. दोन्ही अधिकाऱ्यांना या साहसी मोहिमेची माहिती देण्यात आली असून, त्यांनी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचीही भेट.
याच पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचीही भेट घेऊन या महत्त्वाकांक्षी सोलो बाइक प्रवासाची माहिती देण्यात आली. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनीही या साहसी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
युवकांसाठी जिद्द आणि धाडसाचा संदेश
आलापल्लीच्या मातीतून सुरू होणारा हा प्रवास लेह-लडाखच्या १९,०२४ फूट उंच उमलिंग-ला पर्यंत नेण्याचा संकल्प असल्याने या मोहिमेकडे अहेरीसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मोठे ध्येय ठेवा, आव्हानांना सामोरे जा आणि जिद्दीने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून युवकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

