
प्रतिनिधी |गडचिरोली, दि. १९ सप्टेंबर : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत विषारी सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींच्या मृत्यू झालेल्या गंभीर प्रकरणात अखेर मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणात महिनाभरापासून फरार असलेले संस्थेचे सचिव तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॶॅड. विश्वजित कोवासे यांनी शनिवारी पोलिसांसमोर शरण. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
१० ऑगस्टच्या मध्यरात्री जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनी झोपलेल्या असताना सर्पदंशाची घटना घडली. या दुर्घटनेत दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनू कोरेटी या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर अन्य विद्यार्थिनींवर उपचार करण्यात आले. या घटनेने गडचिरोलीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
चौकशीनंतर पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे, सचिव ॶॅड. विश्वजित कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, विश्वजित कोवासे आणि मारोतराव कोवासे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही विश्वजित कोवासे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याचे वृत्त आहे.
अखेर शनिवारी विश्वजित कोवासे यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांतकुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने कोवासे यांना २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतील त्रुटी, निवासव्यवस्था आणि प्रशासनाची जबाबदारी याबाबतही चौकशीत गंभीर बाबी समोर आल्याचे यापूर्वीच्या वृत्तांत नमूद करण्यात आले आहे.
तीन निष्पाप जीवांचा बळी; आता तपासाची दिशा काय?
तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूने आधीच हादरलेल्या या प्रकरणात संस्थेच्या सचिवाला झालेली अटक ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. पोलिस कोठडीदरम्यान तपास यंत्रणा नेमकी कोणती माहिती आणि पुरावे समोर आणते, तसेच या दुर्घटनेतील जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

