
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.१३ सप्टेंबर : काँग्रेस कार्यकर्ते तथा युवा नेतृत्व ऍड.दुष्यंत नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा देणाऱ्या करिअर मार्गदर्शन व मोफत अभ्यासिका उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी केवळ रोजगाराच्या प्रतीक्षेत न राहता शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून स्वतःच्या क्षमतेला योग्य दिशा द्यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आज रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आर. के. सेलिब्रेशन हॉल, आरमोरी रोड, गडचिरोली येथे हा कार्यक्रम होणार आहे.

गडचिरोलीसारख्या ग्रामीण व आदिवासीबहुल जिल्ह्यात अनेक गुणवंत विद्यार्थी परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून वंचित राहतात. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने मोफत अभ्यासिका सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे आर्थिक परिस्थिती अडथळा ठरू न देता विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा, शिक्षण, करिअरची योग्य निवड, ध्येय निश्चिती आणि यशस्वी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध प्रेरणादायी युवा वक्ते व शिवचरित्र अभ्यासक प्रा. डॉ. विनोद बाबर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ऍड. दुष्यंत किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा हा उपक्रम केवळ वाढदिवसाचा सोहळा न राहता विद्यार्थी आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेला सामाजिक व शैक्षणिक उपक्रम ठरणार असून या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती तसेच युवा मित्र-मैत्रिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ऍड. दुष्यंत नामदेव किरसान मित्र परिवार, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

