
एटापल्ली : अत्यंत कमी हिमोग्लोबिन, प्लेटलेट्सची कमतरता, डेंग्यू संसर्ग तसेच प्री-एक्लेम्पसियासारख्या गंभीर वैद्यकीय गुंतागुंतींना सामोरे जाणाऱ्या गर्भवती महिलेची यशस्वी सिझेरियन प्रसूती करून हेड्री येथील लॉयड्स काली अम्माल रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी माता आणि नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. दुर्गम भागातील अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत करण्यात आलेल्या या उपचारामुळे वैद्यकीय पथकाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
सुमन वेळदा यांना ४ सप्टेंबर रोजी पिपली-दुर्गा प्राथमिक आरोग्य केंद्रातून हेड्री येथील रुग्णालयात संदर्भित करण्यात आले होते. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाच्या अनेक समस्या आढळून आल्या. त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी अवघी २.२ ग्रॅम प्रति डेसीलिटर होती. त्यासोबतच प्लेटलेट्सची संख्या कमी होती, डेंग्यू संसर्ग झालेला होता तसेच प्री-एक्लेम्पसिया आणि हृदयाच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रसूतीदरम्यान मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती होती.
या गंभीर स्थितीत डॉक्टरांनी रुग्णाची सातत्याने वैद्यकीय देखरेख ठेवत आवश्यक उपचार सुरू केले. प्रसूतीदरम्यान आईची प्रकृती अधिक बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाने वेळ न दवडता सिझेरियन शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.४३ वाजता सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेदरम्यान १ किलो ६५७ ग्रॅम वजनाच्या मुलीचा जन्म झाला. जन्मानंतर नवजात बालिकेला तातडीने आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात आली. उपचारांना प्रतिसाद देत बाळाने रडण्यास सुरुवात केली. आईचीही प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिका यांच्या पथकाने विशेष काळजी घेतली.
दुर्गम भागात अत्यंत गुंतागुंतीच्या प्रसूतीचे यशस्वी व्यवस्थापन झाल्याने या प्रकरणाची विशेष चर्चा होत आहे. जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालयात अवघ्या १५ दिवसांत तीन माता-बाल मृत्यूंची प्रकरणे चर्चेत असताना, हेड्रीसारख्या दुर्गम भागातील रुग्णालयात गंभीर जोखमीच्या गर्भवतीची प्रसूती यशस्वी होणे ही बाब आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
या यशस्वी उपचाराबद्दल लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संस्थापक श्री. बी. प्रभाकरन यांनी संबंधित डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन केले. तसेच अशा आव्हानात्मक परिस्थितीत रुग्णसेवा प्रभावीपणे पार पाडणाऱ्या संपूर्ण वैद्यकीय पथकाच्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले.

