
क्रीडा स्पर्धांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळते व्यासपीठ
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी,गडचिरोली
चामोर्शी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून शिक्षणासोबतच क्रीडा आणि शारीरिक शिक्षणालाही तितकेच महत्त्व आहे. क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि नेतृत्वगुण, शिस्त, संघभावना व खिलाडूवृत्ती विकसित होते, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे क्रीडा तथा स्काऊट शिक्षक कालिदास बन्सोड यांनी केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने चामोर्शी तालुका शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून कालिदास बन्सोड बोलत होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बन्सोड म्हणाले की, अभ्यासासोबत मैदानी खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेणे काळाची गरज आहे. क्रीडेमुळे विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वाढतेच, शिवाय मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते. विजयाचा आनंद आणि पराभवाचा स्वीकार करण्याची मानसिकता, आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य, संयम, नियोजन आणि सातत्याने मेहनत करण्याची सवय विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमधून लागते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या खेळात सहभागी होण्यासाठी शाळांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
तालुका शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चामोर्शी तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मैदानावरची ही चुरस विद्यार्थ्यांच्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाला नवी दिशा देणारी ठरत आहे.
क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ स्पर्धात्मक भावना निर्माण होत नसून मैत्री, संघभावना, परस्पर सहकार्य आणि खिलाडूवृत्ती वाढीस लागण्यासही मदत होत आहे. विविध शाळांतील शिक्षक व क्रीडा मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धांसाठी मार्गदर्शन करून त्यांचा उत्साह वाढविला.
यावेळी तालुका समन्वयक राकेश खेवले, प्रमोद भांडारकर, गिरीश तुमंपल्लीवार, पंकज येलमुले, मोरेश्वर कुनघाडकर, कृपांती बोरसरे, चंदु खोब्रागडे, सुरज सोयाम, कार्तिक चौके, सचिन सोमनकर, विशाल आत्राम, राकेश वासेकर, ओम कळसकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार तालुका समन्वयक राकेश खेवले यांनी मानले. यावेळी तालुक्यातील विविध शाळांमधून स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी, शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि क्रीडाप्रेमाने भारलेल्या वातावरणात तालुका शालेय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

