
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर कार्यक्रमस्थळी करण्यात आलेल्या तथाकथित ‘शुद्धीकरणा’च्या कृत्याविरोधात काँग्रेस अनुसूचित जाती विभाग आक्रमक झाला आहे. हे कृत्य अत्यंत निंदनीय, जातीयवादी आणि संविधानाच्या मूलभूत मूल्यांना हरताळ फासणारे असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष गौतम पाल आणि प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांच्या सूचनेनुसार, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून हल्द्वानी येथील कथित ‘शुद्धीकरण’ प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला.
या घटनेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या, कृत्याला प्रोत्साहन देणाऱ्या अथवा त्याचे समर्थन करणाऱ्या संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करून लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

“जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचा अथवा समूहाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही,” अशी भूमिका काँग्रेसने मांडली. अशा प्रकारच्या घटनांमुळे भारतीय संविधानातील समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा अवमान होतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
जातीय भेदभावाला खतपाणी घालणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने केवळ चौकशीपुरते मर्यादित न राहता दोषींवर कठोर आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव पंकज गुड्डेवार, सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश महासचिव नंदूभाऊ वाईलकर, ज्येष्ठ नेते शंकरराव सालोटकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, काँग्रेस शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेवक नंदू कायरकर, NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, कामगार सेल जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर, पांडुरंग घोटेकर, जितेंद्र मुनगाटे, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, रिताताई गोवर्धन, मंजुषा आत्राम, परिवहन जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, हेमंत मोहितकर, आनंदराव पारधी, अवि साळवे, तौफिक शेख, जावेद खान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

