
जखमींची घेतली भेट; उपचारात हलगर्जीपणा न करण्याच्या डॉक्टरांना सूचना
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/देसाईगंज : देसाईगंज–आमगाव मार्गावर झालेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच आमदार रामदास मसराम यांनी कोणताही विलंब न करता रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी अपघातातील जखमी रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या उपचाराची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली.

अपघातग्रस्त व्यक्ती कढोली येथील असल्याचे समोर येताच, त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने घटनेची माहिती देऊन रुग्णालयात बोलावून घेण्यात आले. जखमींना वेळेत आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आमदार मसराम यांनी डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
जखमींची प्रकृती गंभीर असल्यास किंवा पुढील उपचारांची आवश्यकता भासल्यास त्यांना तातडीने योग्य व सक्षम रुग्णालयात रेफर करावे, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी वैद्यकीय यंत्रणेला दिल्या. उपचारादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
अपघाताच्या संकटसमयी रुग्णालयात तातडीने पोहोचून जखमींच्या उपचारासाठी स्वतः लक्ष घालणाऱ्या आमदार मसराम यांच्या या संवेदनशील भूमिकेचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सागर वाढई, स्वप्निल मिसार, गौरव शिलार आणि मोरू मोहुर्ले उपस्थित होते.

