
कृष्णनगर येथील ग्रामीणस्तरीय फुटबॉल स्पर्धेला आमदारांची सदिच्छा भेट; खेळाडूंशी साधला संवाद
चामोर्शी दि. २९ ऑगस्ट : ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा क्षेत्रातील प्रचंड गुणवत्ता दडलेली असून, या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ आणि दिशा मिळणे आवश्यक आहे. ग्रामीणस्तरावर आयोजित होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमुळे खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते. त्यामुळे अशा स्पर्धांना सातत्याने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले.
कृष्णनगर येथे गुरुदेव स्पोर्टिंगच्या वतीने ग्रामीणस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहता न आल्याने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज स्पर्धास्थळी सदिच्छा भेट देत आयोजक, पदाधिकारी तसेच सहभागी खेळाडूंशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी मैदानावर सुरू असलेल्या सामन्यांची पाहणी करून खेळाडूंच्या उत्साहाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील युवकांमध्ये फुटबॉलसह विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्तम क्षमता आहे. मात्र, अनेकदा योग्य संधी आणि मार्गदर्शनाचा अभाव जाणवतो. अशा स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते. भविष्यात या खेळाडूंनी तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरावर आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“जिंकणे-हरणे हा खेळाचा भाग आहे; मात्र मैदानावर उतरून आपले सर्वोत्तम देणे आणि खेळाडूवृत्ती जपणे हीच खरी कामगिरी आहे,” असे सांगत आमदार डॉ. नरोटे यांनी सर्व सहभागी संघ व खेळाडूंना पुढील सामन्यांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, रितेश पालरपवार, युवा नेते भाविक आभारे, बूथ प्रमुख प्रताप ढाली, मनोहर बामणकर, नानु उपाध्याय, मंडळाचे रजनीकांत बाला, अभिजित गाईन, मधु सेन, नितेश बैरागी, रोहित गाईन, सुमंत दास, सुमित मिस्त्री यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, आयोजक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला बळ देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन ही काळाची गरज असून, कृष्णनगर येथील फुटबॉल स्पर्धेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण युवकांच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या आवडीचे द्योतक ठरत आहे.

