
अमरावती – उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केल्याने उद्भवलेल्या वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी भाजपा शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या नेतृत्वात सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्यक्ष पाहणीकरिता रस्त्यावर उतरले व त्यांनी अधिकार्यांना बोलावून वाहतूक सुरळी करण्याच्या सूचना दिल्या.
अमरावती शहराच्या मध्य वस्तीतील अत्यंत व्यस्त अशा राजकमल चौक ते रेल्वे स्टेशन आणि रुक्मिणी नगरकडे जाणारा जुना रेल्वे उड्डाणपूल नादुरुस्त झाला असल्याचा अहवाल आल्यावर प्रशासनाने तडकाफडकी रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला. १९६३ मध्ये बांधलेला हा पूल पूर्णतः धोकादायक झालेला असून काही दिवस आधी या पुलावरून पूर्ण जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली होती; मात्र दोन दिवस आधी प्रशासनाने या पुलावरून आता पूर्णतः दळणवळण बंद करण्यााचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता दुचाकी वाहनांना प्रवेश नसणार किंवा पादचारी मार्ग सुद्धा असणार नाही. मात्र गणेशोत्सवाचा सण आहे, पुढे नवदुर्गा उत्सव दसरा आणि दिवाळी सारखे मोठे उत्सव आहेत, अशा ऐन उत्सवाच्या वेळी अमरावतीकरांची प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रहदारीचा विचार करून वाहतुकीचे नियोजन न केल्याने शहरातील रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आणि त्यामुळे जनतेत तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटली. या जनतेच्या समस्येची दखल भाजपा अमरावती शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी घेतली. त्यांनी महापालिका आयुक्त व वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकार्यांशी बोलून त्यांना प्रत्यक्ष इर्विन चौकात बोलावून घेतले.
उड्डाण पूल नव्याने बनण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे तात्पुरता उपाय न करता स्थायी मार्ग काढण्यासाठी डॉ. नितीन धांडे यांनी राजापेठ, राजकमल चौक, जयस्तंभ चौक व सगळ्यात व्यस्त अशा इर्विन चौकाची प्रत्यक्ष पाहणी केली. नंतर इर्विन चौक येथे वाहतुकीचे स्थायी समाधान काढण्यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्त खाताळे , मनपा उपायुक्त वानखडे, शहर अभियंता रवींद्र पवार, उपअभियंता इंगोले यांच्यासोबत चर्चा करून अनेक सूचना केल्या. या चर्चेनंतर अधिकार्यांनी ताबडतोब वाहतुकीची नवीन योजना तयार करून कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपा अध्यक्षांसोबत प्रा. दिनेश सूर्यवंशी, ललित समदूरकर, बादल कुलकर्णी, राधा कुरील, प्रवीण वैश्य, सुधा तिवारी, विक्की शर्मा, मिलिंद बांबल, राजेश आखेगावकर, विवेक चुटके, श्याम पाध्ये, सविता भागवत, अभिजित वानखडे, प्रफुल्ल बोके, सचिन नाईक, राजेंद्र हजारे, हेमंत श्रीवास्तव, शैलेंद्र मिश्रा, तुषार वानखडे, सुधीर थोरात, संजय आठवले आदी उपस्थित होते.

