
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
चामोर्शी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘विकासासोबत पर्यावरण संवर्धन’ या संकल्पनेतून ग्रामपंचायत सोनापूर येथे विबी-जी रामजी योजनेंतर्गत मेन रोड ते बाबुराव घोंगडे यांच्या शेतापर्यंतच्या पांदण रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. यानिमित्त वृक्षलागवड कामाचा शुभारंभ करण्यात आला.
दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रामपंचायत सोनापूर येथे हा कार्यक्रम पार पडला. पांदण रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून गावाचे सौंदर्यीकरण, हरित क्षेत्रात वाढ तसेच पर्यावरण संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार प्रशांत घोरूडे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सरपंच श्रीमती गोपिका टेकाम, सहायक गटविकास अधिकारी श्रीमती माधुरी येरमे आणि उपअभियंता भैसारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी गावाच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “ग्राम परिसराचे सौंदर्यीकरण, हरितावरण वाढविणे व पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन योगदान द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
वृक्षलागवडीतून पांदण रस्त्याच्या परिसरात हरित पट्टा निर्माण होणार असून, भविष्यात या मार्गाचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांनी या वृक्षांचे संगोपन करून उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाला उपसरपंच शेषराव कोहळे, ग्रामविस्तार अधिकारी निंदेकर व चलाख, मंडळ अधिकारी सचिन मडावी, सदस्या श्रीमती सविता कुणघाडकर, सदस्य संदीप सोयाम, सदस्या श्रीमती दीपाली मेश्राम, माजी उपसरपंच अरुण कुणघाडकर, ग्रामसेवक कु. हर्षा निमसरकार, तलाठी श्रीमती ज्योती ठोबरे, APO हिवराज मेश्राम, TPO राजू बुरे, रायपुरे अभियंता, अभियंते काळे, श्रीमती शेंडे, दहिकर व कु. साखरे, आरोग्य सेवक सोमणकर, रोजगार सेवक नितेश सातपुते, अमिर पिपरे, ओमेश दूधबावरे, अतुल कुणघाडकर, रुपेश दूधबावरे, यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, मजूर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाचा विकास आणि पर्यावरणाचे संवर्धन यांचा समतोल साधत सोनापूर ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

