
सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
गडचिरोली :-
पेंढरी धानोरा तालुक्यातील पयडी ते आलकन्हार, कनेली व सावंगा ते मंगेवाडा या मार्गावर येणाऱ्या मोठ्या नदीवर पुल बांधकामाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात ही नदी उफाळून वाहते व त्यामुळे गावकऱ्यांचे दळणवळण पूर्णपणे खंडित होते. शेतकरी, विद्यार्थ्यांना शाळा–महाविद्यालयात जाता येत नाही, तर रुग्णांना वेळेवर आरोग्यसेवा मिळण्यात अडचणी येतात. तरीदेखील अद्याप शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

मागील वर्षी विद्यमान आमदार डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांनी पयडी गावाला भेट दिली होती. त्यावेळी पयडी, आलकन्हार, मूरचुल व कनेली गावातील ग्रामस्थांनी या पुलासंबंधी निवेदन सादर केले होते. आमदारांनीही ‘निधी मंजूर होताच कामाला तात्काळ सुरुवात केली जाईल’ असे आश्वासन दिले होते. मात्र वर्ष उलटून गेले तरी प्रत्यक्षात कामाची सुरुवात झालेली नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७९ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे, तरीसुद्धा पेंढरी–गट्टा परिसरातील अनेक गावांना आजही पक्के रस्ते, पुलिया, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. आदिवासी जनता अजूनही मूलभूत सोयी–सुविधांपासून वंचित राहत आहे.
या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून शासन व लोकप्रतिनिधींनी नेमके या भागाकडे केव्हा लक्ष देणार, असा सवाल निर्माण झाला आहे. दुर्गापूरचे सरपंच परमेश्वर शेषराव गावडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गावकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही अजून निधी मंजूर झाला नाही. त्यामुळे लोकांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. शासनाने तातडीने या भागातील रस्ते व पुलांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा.
NEWS JAGAR (आवाज सत्याचा)

