
प्रतिनिधी
चामोर्शी,दि.८ जूलै:गडचिरोली जिल्ह्यातील तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेवर शासनाने करोडो रुपयांचा निधी खर्च करून अत्याधुनिक पंपगृह, यंत्रसामग्री व इमारती उभारल्या आहेत. मात्र, इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रकल्पातील महागडी यंत्रसामग्री, विद्युत उपकरणे आणि इतर मालमत्तेच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रत्यक्ष पाहणीत प्रकल्प परिसरात कोणताही सुरक्षा कर्मचारी दिसून आला नाही. पंपगृह परिसरात प्रवेशासाठी कोणतीही कडक सुरक्षा व्यवस्था नसल्याने असामाजिक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून चोरी, तोडफोड किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक मालमत्ता अशा प्रकारे असुरक्षित ठेवण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रकल्पाच्या देखभाल व सुरक्षेकडे होत असलेले दुर्लक्ष भविष्यात या योजनेसाठी धोकादायक ठरू शकते. संबंधित विभागाने तातडीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून संपूर्ण परिसरात प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे.

