
नितेश गट्टीवार गडचिरोली
मुंबई :- पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथील विधानभवनात भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील परिवहन विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील रखडलेल्या बसस्थानकांच्या बांधकामाची कामे तातडीने पूर्ण करावीत, गडचिरोली विभागासाठी नव्या एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात तसेच जिल्ह्यातून राज्यातील विविध प्रमुख शहरांकडे लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू कराव्यात, अशी मागणी केली.

याशिवाय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक, वाहक (कंडक्टर), मेकॅनिकल व यांत्रिकी विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, जेणेकरून बससेवा अधिक सक्षम होऊन नागरिकांचा प्रवास सुरक्षित, नियमित व सुखकर होईल, अशीही मागणी त्यांनी केली.
परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मांडलेल्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांमार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. व लवकरच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करण्याचे आश्वासन दिले.
गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात सक्षम आणि दर्जेदार परिवहन व्यवस्था उपलब्ध होणे ही काळाची गरज असून, यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी पसं उपसभापती विलास दशमुखे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, नीरज पटेल आदी उपस्थित होते.

