
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली /मुंबई:- राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथील विधानभवनात भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित व जनहिताच्या प्रश्नांबाबत राज्य शासनाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, आदिवासी विकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जलसंपदा मंत्री, ग्रामविकास मंत्री तसेच वन मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्ह्यातील विविध समस्यांसंदर्भातील निवेदने सादर केली.
निवेदनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते, सिंचन, वनहक्क, आदिवासी विकास, महसूल, ग्रामविकास, पायाभूत सुविधा तसेच विविध विकासकामांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही माजी आमदार डॉ. होळी यांनी केली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, नीरज पटेल, सचिन येनप्रेड्डीवार आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विविध प्रश्नांबाबत शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


