
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली
चामोर्शी, दि. ८ जुलै : येनापूर महसूल मंडळातील अड्याळ, रश्मीपूर, किष्टापूर आणि सगनापूर ही गावे अप्पर तहसील आष्टी येथे जोडण्याच्या प्रस्तावाला संबंधित गावांतील नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी, चामोर्शी यांना लेखी आक्षेप अर्ज सादर करून ही गावे चामोर्शी तहसील कार्यालयातच कायम ठेवावीत, अशी मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, २३ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या उद्घोषणा पत्रानुसार येनापूर महसूल मंडळातील काही गावे अप्पर तहसील आष्टी येथे जोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, संबंधित चार गावांचा दैनंदिन व्यवहार, बाजारपेठ, बँकिंग सेवा, आरोग्य सुविधा तसेच शासकीय कार्यालयांशी संपर्क हा प्रामुख्याने चामोर्शीशीच जोडलेला आहे.

निवेदनानुसार, आष्टी हे गाव अड्याळपासून सुमारे १९ किलोमीटर अंतरावर असून, चामोर्शी अड्याळपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे.सर्व कामे चामोर्शी येथेच होत असल्याने ही गावे अप्पर तहसील आष्टीमध्ये समाविष्ट करू नयेत, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
शेतीमालाची विक्री, बँक व्यवहार, आरोग्य सेवा, शासकीय कामकाज आणि इतर आवश्यक कामांसाठी नागरिकांचा चामोर्शीशी दीर्घकाळापासून संबंध असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या भावना आणि व्यवहार्य अडचणी लक्षात घेऊन अड्याळ, रश्मीपूर, किष्टापूर व सगनापूर ही गावे चामोर्शी तहसीलमध्येच कायम ठेवावीत, अशी मागणी निकेश गद्देवार, सुभाष मडावी (रेश्मीपूर), सुनील कोसनकर (सगनापूर) आणि अशोक धानफले (किष्टापूर) आदींनी केली आहे.

