
चामोर्शी, दि. ८ : शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चामोर्शीच्या नावाचा गैरवापर करून केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत तब्बल ₹2 लाख 93 हजार 400 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहसंचालक, उच्च शिक्षण नागपूर विभागातील प्रशासन अधिकारी शंकर रामजी बर्गे (वय 49) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी आदित्य मेंहदळे (हेड ऑफ इन्स्टिट्यूट – HOI) आणि रागार कल्वी निलयम (इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर – INO) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (पूर्वीच्या भा.दं.वि.) कलम 420, 465, 468, 471, 34 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66(ड) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2021-22 व 2022-23 या शैक्षणिक वर्षांदरम्यान आरोपींनी National Scholarship Portal वर शासकीय आयटीआय, चामोर्शीचा UDISE कोड वापरून बनावट युजर आयडी तयार केला. त्यानंतर स्वतःला हेड ऑफ इन्स्टिट्यूट (HOI) व इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर (INO) म्हणून दाखवत 22 बनावट विद्यार्थ्यांच्या नावाने शिष्यवृत्ती अर्ज भरले.

या बनावट अर्जांच्या आधारे शासनाकडून ₹2,93,400 इतकी शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
संबंधित विभागामार्फत प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आल्याने गुन्हा नोंद होण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 59/2026 दिनांक 6 जुलै 2026 रोजी रात्री 8.23 वाजता चामोर्शी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक डोंब करीत असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

