
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली
गडचिरोली, दि. ९ जूलै : गडचिरोली शहरालगतच्या चांदाळा जंगल परिसरात जंगली हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न एका युवकाच्या जीवावर बेतला. हत्तीने अचानक केलेल्या हल्ल्यात मेंढा येथील धनराज पुंजीराम मडावी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (८ जुलै) सायंकाळी सुमारे ७.४५ वाजताच्या सुमारास चांदाळा जंगल परिसरात एक जंगली हत्ती दिसून आल्याची माहिती परिसरात पसरली. त्यानंतर अनेक नागरिक हत्तीला पाहण्यासाठी तसेच मोबाईलवर फोटो व सेल्फी घेण्यासाठी घटनास्थळी जमा झाले.

याचवेळी धनराज मडावी यांनी हत्तीच्या अगदी जवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हत्तीने अचानक आक्रमक होत त्यांच्यावर हल्ला केला आणि पायाखाली तुडवल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाचे आवाहन: जंगली हत्ती किंवा इतर वन्यप्राणी दिसल्यास त्यांच्या जवळ जाणे, सेल्फी किंवा छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न करणे टाळावे. सुरक्षित अंतर राखून त्वरित वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

