
“देश, समाज आणि व्यक्तीचा सर्वांगीण विकास शिक्षणानेच शक्य” – डॉ. प्रकाश गेडाम
प्रतिनिधी /चामोर्शी : जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, चामोर्शी येथे २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून दर शुक्रवारी ‘सरस्वती पूजन’ हा संस्कारमूल्य जपणारा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ भाजपा जिल्हा महामंत्री तथा मा. सिनेट सदस्य आणि शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. प्रकाश गेडाम यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. गेडाम म्हणाले की, “देश, समाज आणि व्यक्तीचा सर्वांगीण विकास शिक्षणानेच शक्य आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; ते प्राशन केल्याने व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि नेतृत्वगुण निर्माण होतात. जिल्हा परिषद शाळा संस्कारवान, चारित्र्यसंपन्न आणि जबाबदार पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. शिक्षणाची देवी माता सरस्वतीचे नियमित पूजन करण्याचा हा उपक्रम निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार आणि सकारात्मक विचार रुजविणारा ठरेल.” त्यांनी या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंदाताई वानखेडे होत्या. यावेळी प्राचार्या मिना गद्देवार, समिती सदस्य सुधीर गडपायले, दामोदर पेशट्टीवार, अविनाश तालापल्लीवार, तसेच हर्षा रंदये, संगीता मोटघरे, पद्मा शिवरकर, पूजा चचाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्रा वडेट्टीवार यांनी केले, तर वर्ग १२ वीची विद्यार्थिनी खुशबू गिरीधर मोहुर्ले हिने आभार मानले.
दर शुक्रवारी होणाऱ्या या ‘सरस्वती पूजन’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आदर, संस्कार आणि नैतिक मूल्यांची जपणूक होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

