
अमरावती – अमरावती जिल्हा परिषदेच्या सर्व 59 मतदारसंघांची परिसीमा (रचना) जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी या नात्याने विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी ही घोषणा केली.या घोषणेमुळे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मतदारसंघाचे परिसिमन निश्चित झाले असून त्यात कोणती गावे समाविष्ट आहेत, हे नागरिकांना बघणे शक्य झाले आहे. त्यासाठी या अंतिम याद्या तहसील कार्यालय, पंचायत समिती व जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेत अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मतदार संघाच्या रचनेचे प्रारूप घोषित झाल्यानंतर जिल्हाभरातून तब्बल 18 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. हरकतीच्या स्वरूपातील या तक्रारींपैकी केवळ दोन तक्रारी मान्य झाल्या आहेत. इतर सर्व 16 हरकती अमान्य करण्यात आल्या. आपण घेतलेली हरकत मान्य झाली की नाही हे बघण्यासाठी नागरिकांना आजच्या यादीची प्रतीक्षा लागली होती. जाहीर प्रकटनानन्तर ती एकदाची आता संपुष्टात आली आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने घोषित केलेल्या प्रारूप यादीवर चांदुर रेल्वे आणि चिखलदरा तालुक्यातून सर्वाधिक प्रत्येकी चार तक्रारी (हरकती) प्राप्त झाल्या होत्या. याशिवाय अचलपूर, मोर्शी, तिवसा व भातकुली तालुक्यातून प्रत्येकी दोन तर धारणी आणि दर्यापूर तालुक्यातून प्रत्येकी एक तक्रार प्राप्त झाली होती. यापैकी चिखलदरा आणि अचलपूर तालुक्यातील एकेक तक्रार मान्य करण्यात आली आहे.

राज्य शासनाने अलिकडेच केलेल्या घोषणेनुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत्या काही दिवसांनी होणार आहे. त्यासाठी मतदारसंघांची परिसीमा निश्चित करण्याचे काम जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले.
प्रारूप जाहीर झाल्यानंतर नागरिकांमार्फत हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात गोळा झालेल्या या सूचना व हरकतींची सुनावणी पुढे विभागीय आयुक्तांच्या दालनात ५ ऑगस्टला पूर्ण झाली. त्यानंतर आयोगानेच आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार आज सायंकाळी मतदारसंघांची अंतिम रचना घोषित करण्यात आली. नव्या रचनेनुसार अचलपूर तालुक्यात एक मतदारसंघ वाढल्याने तेथे पाच गट तयार झाले असून चांदुर रेल्वे तालुक्यातील एक मतदारसंघ कमी झाला आहे.

