
अरुण बारसागडे , उपसंपादक, न्यूज जागर चंद्रपूर
गेल्या आठवड्याभरापासून गडचिरोली जिल्ह्यातून वैनगंगा नदी पार करीत सावली तालुक्याच्या हद्दीत हत्तींच्या कळप आलेला आहे. सदर कळप हा गेल्या आठ दिवसापासून पाथरी,गोलभुज,सादागड परिसरात असताना आज दिनांक 8 जून ला पहाटे च्या सुमारास हत्तींच्या कडप हा खेडी मार्गे सावली येथील मालकी मालगुजारी मोठा तलाव येथे आलेला आहे. तलावात काही काळानंतर पुन्हा हत्ती गोसेखुर्द नहाराच्या दिशेतून लहान तलावाकडे वस्ती भागात जाण्याचा प्रयत्न केला. मानव-वन्यजीव यांच्यात संघर्ष होऊ नये या साठी वनविभागाने ते हुसकावून लावला आणि पुन्हा एकदा सदर 30 हत्तीचा कळप हा सावली च्या मोठ्या तलावात विश्रांती साठी आज सकाळ पासून वृत्त लिहेपर्यंत त्याच ठिकाणी होता.
सदर हतींना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी जमली मात्र हत्तींना कसलाही त्रास होऊ नये यासाठी वनविभाग सावली व पोलीस स्टेशन सावलीची टीम त्या ठिकाणी हजर आहे. वनविभागाने हतींचा येणाऱ्या मार्गात कुणी ये-जा करू नये याकरिता सावली ते कवठे हा मार्ग काही काळांसाठी बंद करण्यात आलेला आहे.

आत्ता सध्या हत्ती हे मालकी मालगुजारी तलावामध्ये विश्रांतीसाठी असल्याचे दिसून येत आहे.मात्र संबंधित हत्तीच्या कळपा कडे सावली वन परिक्षेत्र विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच सावली पोलीस हे लक्ष ठेवून आहेत.
सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी ची रणनीती सुरू
अचानक सावली च्या दिशेने आलेला हत्तींचा कळपाने सावली वनविभाग अक्षरशः भांबावून गेल्याचे दिसले.गावाच्या दिशेने येणारा कळप आणि मानव-प्राणी संघर्ष होईल का? अश्या परिस्थितीत हत्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पश्चिम बंगाल चे हत्ती तज्ञ श्याम टॅटू यांना पाचारण करण्यात आले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रणनीती आखली जाईल अशी माहिती मिळते आहे.
बघण्यासाठी अनेकांची गर्दी;मार्ग बंद
हत्तींचा कळप हा सावली शहरात जवळ आल्याचे कळल्याने अनेक जण आपल्या परिवारासह कौतुकाने या हत्तींना पाहण्यासाठी तलावाकडे गर्दी जमा केली होती. वाढती गर्दी लक्षात घेत वनविभाग सावली व पोलीस स्टेशन सावली यांनी या गर्दीला नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करीत होते.व हत्तींना मार्गक्रमणात त्रास होऊ नये याकरिता सावली- कवठी मार्ग सुद्धा बंद करण्यात आलेला आहे.

