
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/चामोर्शी:
चामोर्शी तालुक्यातील बल्लू वाकडी येथील एका सर्वसामान्य सुतारकाम करणाऱ्या मजुराच्या मुलींनी आपल्या जिद्दीच्या जोरावर यशाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. कु. शालिनी दुगुनलावार हिने गांधी रिसर्च फाउंडेशनच्या “शाश्वत ग्रामीण पुनर्निर्माण (Sustainable Rural Reconstruction)” या अभ्यासक्रमासाठी ‘जेआरएफ’ (JRF) मिळवून आपल्या कुटुंबाचा आणि तालुक्याचा गौरव वाढवला आहे.
दुगुनलावार कुटुंबासाठी ही अभिमानाची बाब आहे, कारण या कुटुंबातील ही केवळ एकच यशोगाथा नाही. यापूर्वी, मागील वर्षी शालिनीच्या मोठ्या बहिणीची नोएडा येथील प्रतिष्ठित ‘शिव नाडर विद्यापीठ’ मध्ये ‘रूरल मॅनेजमेंट’ (Rural Management) अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती.

एका मजुरी करणाऱ्या कुटुंबातील या दोन्ही बहिणींची प्रतिकूल परिस्थितीतून झालेली ही यशस्वी वाटचाल ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. या दोन्ही बहिणींचे हे यश सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

