
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली,दि.२९ मे:
खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी सध्या खतांची खरेदी करत आहेत. याच काळात बाजारपेठेतून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. खतांच्या किमती वाढल्यामुळे, एकाच प्रकारच्या खताच्या वेगवेगळ्या पिशव्यांवर (बॅग्ज) वेगवेगळी छापील किंमत (MRP) असू शकते. याचा फायदा घेत काही विक्रेते जुन्या साठ्यातील खते वाढीव नवीन किमतीत विकत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी: खत खरेदी करताना पिशवीवर छापलेली किंमत नीट तपासा आणि त्यापेक्षा एक रुपयाही जास्त देऊ नका.

खत खरेदी केल्यानंतर कृषी केंद्राकडून अधिकृत आणि पक्के बिल नक्की घ्या. भविष्यात कोणतीही फसवणूक झाल्यास हे बिल महत्त्वाचा पुरावा ठरते.
जर एखादा विक्रेता छापील किमतीपेक्षा जास्त पैसे मागत असेल, तर त्याची त्वरित तक्रार करा.
शेतकऱ्यांची होणारी लूट रोखण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाभरात खतांचा काळाबाजार आणि अनधिकृत दरवाढ रोखण्यासाठी एकूण २० भरारी पथके आणि निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, अधिक दराने खतांची विक्री होत असल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित माहिती द्यावी. नामांकित कंपनीचीच खते आणि बियाणे खरेदी करावेत आणि बिलाची नमुना प्रत जपून ठेवावी.तक्रार निवारणासाठी:
शेतकरी आपली तक्रार नोंदवण्यासाठी ८२७५६९०१६९ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

