
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली,दि.१७ जूलै:
NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी तसेच पर्यावरणप्रेमी व शिक्षण सुधारणा कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत गडचिरोली येथे शुक्रवारी भव्य लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
शहरातील इंदिरा चौकात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. NEET पेपरफुटी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर अंकुश आणावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार महत्त्वाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. २० जुलैपर्यंत न्याय मिळाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. तसेच नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गडचिरोलीतील सर्व सहभागी संघटनांनी संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.
यानंतर भारताच्या राष्ट्रपतींना उद्देशून तयार करण्यात आलेले निवेदन गडचिरोलीचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्याकडे आंदोलनस्थळीच सादर करण्यात आले.
या आंदोलनात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास राऊत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. महेश कोपुलवार, BRSP चे मिलिंद बांबोळे, रिपब्लिकन पक्षाचे हंसराज उंदीरवाडे, भाकपचे देवराव चवडे, संविधान फाउंडेशनचे गौतम मेश्राम, आदिवासी युवा परिषदचे कुणाल कोवे, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे माधव गावड, ओबीसी महासंघाचे प्रा. शेषराव येलेकर, अनिसचे विलास निबोंरकर, सर्वोदय मंडळाचे प्रा. देवानंद कामडी, कास्ट्राईब संघटनेचे राजकुमार घोडेस्वार, वीर बाबुराव समितीचे वसंतराव कुलसंगे, मराठा सेवा संघाचे सुरेश लडके, माळी समाज संघटनेचे हरिदास कोटंगी, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रा. गौतम डांगे, आदिवासी महिला संघटनेच्या आरती कोले, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे अशोक राऊत, निलेश राऊत,समिर देशमुख,सत्या देशमुख, मंगेश सरपे ,दिपरत्न सहारे ,केतन राऊत प्रा. अशोक लांजेवार, तुळशीदास सहारे, सोनू आलाम, रिपब्लिकन महिला आघाडीच्या नीता सहारे, सुनीता रायपुरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाची रिपरिप सुरू असतानाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
आंदोलकांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांच्या मागण्यांचा सन्मान करण्याची मागणी सरकारकडे केली.

