
फिलिपाईन्समधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून अवघ्या साडेतीन महिन्यांच्या तयारीत यश; चामोर्शीच्या सुपुत्राने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
चामोर्शी,दि. १७ जुलै :

फिलिपाईन्समधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) या अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश मिळवणारे डॉ. अमेय ओल्लालवार यांचा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. अमेय ओल्लालवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चामोर्शी तालुका संघचालक किशोर ओल्लालवार यांचे सुपुत्र आहेत.
फिलिपाईन्समधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन अवघ्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत शिस्तबद्ध, सातत्यपूर्ण आणि जिद्दीने FMGE परीक्षेची तयारी केली. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करत कुटुंबासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढविला.
परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी FMGE ही भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण पात्रता परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून भारतात वैद्यकीय नोंदणी व वैद्यकीय व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा होतो. विशेष म्हणजे, यंदा FMGE परीक्षेचा एकूण उत्तीर्णतेचा दर केवळ 12.38 टक्के इतका असल्याने डॉ. अमेय यांचे यश अधिकच उल्लेखनीय ठरले आहे.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी डॉ. अमेय यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवून समाजासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.या सत्कार समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चामोर्शी तालुका संघचालक किशोर ओल्लालवार तसेच दिलीप चलाख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अमेय ओल्लालवार यांच्या या यशामुळे चामोर्शीसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशाने अनेक विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.

