nagpur news

नागपूर : नागपूरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील असुविधांविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणाऱ्या एका विद्यार्थिनीला वसतिगृह प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित विद्यार्थिनीला ‘नोकरी करत असल्याचे’ कारण देत वसतिगृह रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थिनीने हे आरोप फेटाळून लावत आपण केवळ अभ्यासक्रमाचा भाग म्हणून इंटर्नशिप करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
संबंधित विद्यार्थिनी ही गरीब शेतकरी कुटुंबातील असून नागपुरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आणि इतर विद्यार्थिनींनी वसतिगृहातील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. विशेषतः उन्हाळ्यात कुलरची सुविधा नसल्याने विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आल्याचे सांगितले जाते. तसेच विदर्भातील मुलींच्या वसतिगृहांसाठी सुमारे ६०० कुलर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती विद्यार्थिनीने दिली. Retaliation for Complaining to Chief Minister Devendra Fadnavis? Student Issued Notice to Vacate Hostel
मात्र, तक्रार केल्यानंतर प्रशासनानेच दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. “आम्ही आमच्या अडचणी मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. पण त्यानंतर प्रशासनाने आमच्या कॉलेजमध्ये जाऊन आम्ही थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणे योग्य नसल्याचे सांगितले. काही अडचण असेल तर समाजकल्याण विभागाकडे तक्रार करायला हवी होती, असेही सांगण्यात आले,” असा आरोप विद्यार्थिनीने केला. तसेच “जर इथे राहायचे नसेल तर घरी जा,” असेही प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचा दावा तिने केला आहे.
दरम्यान, विद्यार्थिनीला बजावण्यात आलेल्या नोटिशीत ती नोकरी करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, “मी कुठेही नोकरी करत नाही. मी केवळ इंटर्नशिप करत आहे आणि तो माझ्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्या प्रोजेक्टला गुण मिळतात, त्यामुळे ती करणे आवश्यक आहे,” असे स्पष्टीकरण विद्यार्थिनीने दिले आहे
#cm devendra fadanvis

