korchi news 2

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
फलकांशिवाय सुरू कामांवर नागरिकांचा संताप; “हिशोब द्या नाहीतर काम थांबवा” असा इशारा
कोरची नगरपंचायत हद्दीत सुरू असलेल्या कोटींच्या विकासकामांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात रस्ते, नाली, सिमेंट काँक्रीट, इमारत बांधकाम अशी विविध कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतानाही त्या कामांची मूलभूत माहिती नागरिकांपासून लपवली जात असल्याचा आरोप होत आहे.

यामुळे संतप्त नागरिकांनी आता थेट प्रशासनालाच जाब विचारत “माहिती फलक लावा नाहीतर कामे थांबवा” असा आक्रमक इशारा दिला आहे.
माहितीच गायब – पारदर्शकतेवर प्रश्न
नगरपंचायत क्षेत्रातील बहुतांश ठिकाणी कामे सुरू असली तरी त्या ठिकाणी कामाचे नाव, मंजूर निधी, कामाचा कालावधी, कंत्राटदाराचे नाव यासारखी कोणतीही माहिती फलकावर दिसत नाही.
यामुळे नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून,
“कोटींच्या कामांचा हिशोब नेमका कुठे लपवला जातोय?” असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
नागरिकांचा संताप उफाळला
स्थानिक नागरिकांच्या मते,
“विकासकामांचा हिशोब फक्त फाईलमध्ये ठेवायचा आणि जनतेपासून लपवायचा, ही पद्धत आता चालणार नाही.”
“फलकावर स्पष्ट माहिती दिली तरच कामाची खरी पारदर्शकता दिसेल, अन्यथा हा सगळा प्रकार संशयास्पद वाटतो.”
कोरचीकरांचा थेट सवाल
कोणत्या योजनेतून निधी आला?
किती खर्च मंजूर झाला आणि किती खर्च झाला?
काम कोणत्या कंत्राटदाराकडे आहे?
काम पूर्ण होण्याची अंतिम तारीख कोणती?
या सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळत नसल्याने प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
#कोरची #korchi #newsjagar

