
सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
बँक लिंक फैल व नेटवर्क समस्येमुळे पेंढरीतील व परिसरातील नागरिकांचे हाल
पेंढरीत बँकेचा व्यवहार ठप्प नागरिक त्रस्त
—————————————-

पेंढरी :- पेंढरी येथील दि. डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक गेल्या अनेक दिवसांपासून लिंक फेल झाल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. बँकेत वेळेवर रक्कम उपलब्ध होत नाही आणि ५ हजार रुपयांच्या पुढे रक्कम देण्यात येत नसल्यामुळे शेतकरी, वयोवृद्ध तसेच महिला वर्ग त्रस्त झाले आहेत.
दररोज शेकडो नागरिक पैसे काढण्यासाठी बँकेत रांगा लावून उभे राहतात, मात्र लिंक न आल्यामुळे काम होत नाही. हातात पैसे न मिळाल्याने लोकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोळा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र बँकेचे व्यवहार ठप्प असल्याने शेतकऱ्यांचा सण कोरडाच जाण्याची शक्यता आहे. या दिवसांत शेतकऱ्यांना बैलजोडीच्या सणासाठी तसेच शेतीसाठी रोख रकमेची मोठ्या प्रमाणात गरज असते. परंतु बँक लिंक फेलमुळे ते पैसे मिळवू शकत नाहीत.
फक्त बँकेचाच नव्हे तर परिसरातील नेटवर्क समस्याही गंभीर स्वरूप धारण करत आहे. गावोगावी एअरटेलचे टॉवर उभारण्यात आले असून अनेकांनी नवे सिमकार्ड घेतले किंवा जुनी सिम एअरटेलमध्ये रूपांतरित केली, मात्र टॉवर असूनही नेटवर्क व्यवस्थित चालत नसल्यामुळे नागरिकांचा संताप वाढला आहे.
सध्या पेंढरी व परिसरात बँक व्यवहार बंद, नेटवर्क समस्या आणि पावसाळ्यातील अडचणी या तिहेरी संकटामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. प्रशासन व बँक व्यवस्थापनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
————————————————–
NEWS JAGAR (आवाज सत्याचा)
SONU WALKE DISTRICT REPORTER

