
नितेश गट्टीवार,गडचिरोली (चामोर्शी)दि.२ मार्च:
चामोर्शी शहरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त आज भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. सकाळपासूनच शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळली होती. “जय श्रीराम” आणि “जय हनुमान”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या पावन प्रसंगी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शीतील विविध हनुमान मंदिरांना भेट देत विधीवत पूजा-अर्चना केली. त्यांनी श्री हनुमंताच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील व देशातील सर्व नागरिकांच्या सुख-शांतीसाठी, समृद्धीसाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्यांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला होता.

मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला होता, तसेच भजन-कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आरत्या केल्या, तर तरुणांनी उत्साहाने स्वयंसेवक म्हणून सेवा बजावत होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.
यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी शांततेत व भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रसाद वितरणाच्या वेळी सर्वत्र आनंद, समाधान आणि एकात्मतेचे वातावरण अनुभवायला मिळाले.
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत धार्मिक सण हे समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम असल्याचे सांगितले. त्यांनी सर्वांना सामाजिक सलोखा जपण्याचे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या सोबत दिलीप चलाख, हिराजी बनपूरकर, अनिल प्रिसिंगलवार, जयराम चलाख आदि उपस्थित होते.
हनुमान जन्मोत्सवाच्या या पावन निमित्ताने चामोर्शी शहरात श्रद्धा, भक्ती आणि एकजुटीचा सुंदर संगम पाहायला मिळाला. हा सोहळा नागरिकांच्या मनात भक्तीची उर्जा आणि सकारात्मकता निर्माण करून गेला.

