
प्रतिनिधी | चामोर्शी, दि.३ जुलै : जमीन अधिग्रहणासंदर्भात आपल्या नावाचा गैरवापर करून बदनामी केली जात असल्याचा आरोप अड्याळ येथील निकेश सुधाकर गद्देवार यांनी केला. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
गद्देवार यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी जमीन अधिग्रहणाबाबत त्यांच्या नावासह “शेतकऱ्यांनी जमीन भाडेतत्त्वावर द्यावी” असा मजकूर असलेले वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, त्या वृत्ताशी आपला कोणताही संबंध नसून, त्याबाबत आपण विविध शेतकरी व्हॉट्सॶॅप समूहांमध्ये तसेच संबंधित व्यक्तींशी थेट संपर्क साधून वस्तुस्थिती स्पष्ट केली होती.
तरीही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय हेतूने आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढत आलो असून त्यांच्या मदतीसाठी सातत्याने कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत बोलताना गद्देवार यांनी पुढे सांगितले की, एका व्हॉट्सअप समूहामध्ये त्यांच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात आला तसेच अपशब्द वापरून धमकीवजा संदेशही पाठविण्यात आले. या प्रकारामुळे स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, तक्रार दिल्यानंतरही नेमा घोगरे नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सॶॅपवर बॅनर तयार करून त्यामध्ये आपले नाव वापरत वारंवार बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. एकाच व्यक्तीकडून सातत्याने बदनामी व मानसिक त्रास दिला जात असल्याने आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडे धाव घ्यावी लागल्याचे गद्देवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

