
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (ए) वरील पोहर नदीवरील जुना पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, पुलावरील मोठमोठे खड्डे, संरक्षक कठड्यांचा अभाव आणि अपूर्ण नवीन पुलाचे काम यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन पुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नसल्याने सर्व प्रकारची वाहतूक जुन्या पुलावरूनच सुरू आहे. मात्र पुलावरील रस्ता पूर्णपणे उखडला असून मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रस्ता अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना मार्ग देताना अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते.

विशेष म्हणजे पुलावर संरक्षक कठडे नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुलावरील खड्ड्यात एक चारचाकी वाहन अडकल्याची घटनाही घडली होती. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, चिचडोह धरणातील पाणीसाठ्यामुळे पोहर नदीची पातळी वाढली असून अशा परिस्थितीत या पुलावरून प्रवास करणे अधिक धोकादायक बनले आहे. या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, शासकीय कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
याबाबत काँग्रेसचे मीडिया तालुकाध्यक्ष विजय लाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने नवीन पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरू करावे, तोपर्यंत जुन्या पुलावरील खड्डे बुजवून आवश्यक दुरुस्ती करावी, संरक्षक कठडे बसवावेत आणि अपूर्ण पोहोच मार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

