
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी , गडचिरोली
छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम
उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उष्णतेत प्रवासी व नागरिकांची तहान भागवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाच्या वतीने कोरची येथे पाणपोई सुरू करण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन कोरची पोलीस स्टेशनचे निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या हस्ते शरबत वितरण करून करण्यात आले.

यावेळी उद्घाटक शैलेंद्र ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “कोणतेही कार्य यशस्वी करण्यासाठी केवळ इच्छा असून चालत नाही, तर त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक असते. बचत गटाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांची तहान भागवून ‘जीवनदानाचे कार्य’ केले आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.”
छत्रपती शिवाजी महाराज बचत गटामार्फत विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, अनेक गरजू नागरिकांना वेळोवेळी मदतीचा हात देण्याचे कार्यही गटाच्या माध्यमातून केले जात आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मन्सारामजी अंबादे होते. प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पवार (पोलीस उपनिरीक्षक), सदरुद्दीन भामानी, देवराव गजभिये, नंदूजी गोबाडे, नसरुद्दीन भामानी, अजय पुल्लूरवार, घनश्याम अग्रवाल, नितेश रहेजा, चेतन कराडे, सुरज हेमके, सुरेश मेश्राम, मारोती जाधव, लोकमान्य दोनाडकर तसेच बचत गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. newsjagar
बचत गटाचे सचिव सुरज हेमके यांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज हेमके यांनी केले, तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष घनश्याम अग्रवाल यांनी मानले.

