
सुपीक शेतजमिनींच्या अधिग्रहणाविरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली ठरणार पुढील दिशा
नितेश गट्टीवार,गडचिरोली दि.२७मार्च:
गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथे २९ मार्च रोजी दुपारी १ वाजता शेतकऱ्यांचे भव्य चर्चासत्र कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याच्या नावाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करून त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार विरोध होऊनही शासन विविध माध्यमातून जमीन अधिग्रहण प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करत आहे.
यापूर्वी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, जयरामपूर परिसरातील शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. त्यानंतर भेंडाळा परिसरातील 14 गावांमधील सुपीक जमीन अधिग्रहणाचा प्रयत्न झाला, मात्र स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना सुद्धा आता परत चामोर्शी व गडचिरोली तालुक्यातील सुमारे 30-35 गावांमध्ये जमीन अधिग्रहित होणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून येत असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका ठरविण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली जमीन अधिग्रहित होणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांचे भव्य चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतजमिनीच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

