
मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यातच दुर्लक्षित कारभार
नितेश गट्टीवार गडचिरोली,दि.२२ मार्च
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे रविवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन पार पडले.

गडचिरोली माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील कारभारावर शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष नागो गाणार यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात सध्या प्रचंड अनागोंदी माजली असून, कार्यालयीन वेळेत कामकाज न करता रात्री उशिरापर्यंत नियमबाह्य व्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष व माजी आमदार नागो गाणार यांनी केला आहे. या कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची तत्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गडचिरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे रविवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कामकाजाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दिवसा कामकाज करण्याऐवजी सायंकाळी ६ नंतर रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक स्थिती आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न पाहता, शिक्षकांना रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवणे अत्यंत धोकादायक आणि त्रासदायक आहे. जीव धोक्यात घालून जिल्हा मुख्यालयात आलेले शिक्षक पदरी निराशा घेऊनच परतत असल्याचे विदारक चित्र आहे. कार्यालयीन वेळेत अधिकारी उपस्थित का नसतात आणि रात्री उशिरापर्यंत कोणते ‘विशेष’ कामकाज चालते, असा सवाल आता शिक्षक वर्गातून उपस्थित केला जात आहे.
शिक्षक परिषदेने केलेल्या तक्रारीची दखल घेत शिक्षण संचालक (पुणे) यांनी २५ जुलै २०२५ रोजीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, शिक्षण उपसंचालक (नागपूर विभाग) यांनी अद्याप यावर कोणताही अहवाल सादर केलेला नाही. ही बाब प्रशासकीय शिस्तीचे उल्लंघन करणारी आणि गंभीर स्वरूपाची असल्याचे गाणार यांनी म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, त्यांच्याच कार्यक्षेत्रात शिक्षणाधिकारी कार्यालयाची अशी दुरावस्था होणे निंदनीय आहे. या कार्यालयातील दुर्व्यवहार आणि अनियमितता आता सहन केली जाणार नाही. शासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन संबंधितांना वठणीवर आणावे, अशी रोखठोक भूमिका नागो गाणार यांनी मांडली आहे. या अधिवेशनात शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून, प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

