
नितेश गट्टीवार गडचिरोली ,दि.२२ मार्च
देसाईगंज येथील साईबाबा मंदिर, हनुमान वॉर्ड येथे रामनवमी निमित्त संगीतमय श्री शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कथा वाचक आचार्य हरीश चतुर्वेदी यांनी शिवमहापुराणातील विविध अध्याय, शिव-सती चरित्र आणि पार्वती जन्म यांसारख्या पौराणिक प्रसंगांचे सखोल व प्रभावी निरूपण केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
या प्रसंगी माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी विशेष उपस्थिती दर्शवून नागरिकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात रामनवमीचे धार्मिक महत्त्व, शिवभक्तीची परंपरा आणि समाजात सद्भावना, नैतिक मूल्ये व संस्कार टिकवून ठेवण्याची गरज यावर प्रकाश टाकला. तसेच अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान आयोजकांच्या वतीने शिव-सती चरित्र तसेच पार्वती जन्मोत्सवावर आधारित संगीतमय नाट्य सादरीकरण सादर करण्यात आले. या नाट्यप्रयोगात कलाकारांनी प्रभावी अभिनय आणि संगीताच्या माध्यमातून पौराणिक कथा जिवंत केल्या. उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक केले. या आद्यात्मिक सोहळ्यात आयोजकांतर्फे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा शाल व साईबाबा यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या भव्य आध्यात्मिक सोहळ्याला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांनीही आयोजकांचे कौतुक करून अशा धार्मिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच या आध्यात्मिक सोहळ्यास नरेश विठ्ठलांनी नप उपाध्यक्ष वडसा, राजू जेठानी नगरसेवक, राजू रासेकर नगरसेवक, भरत बावनथळे नगर सेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने भाविक, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. या कार्यक्रमामुळे देसाईगंजमध्ये रामनवमीचा उत्सव अधिकच उत्साहात आणि भक्तीभावात साजरा करण्यात आला

