
नितेश गट्टीवार गडचिरोली,दि.२१ मार्च:
गडचिरोली -चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 वर नुकताच बांधकाम करण्यात आलेला सिमेंट काँक्रेट रस्ता अल्पावधी काळातच खराब होऊन ठिकठिकाणी भेगा पडल्या असून चक्क या भेगांवर ठिकठिकाणी सळई चे टाके मारण्यात आले असून संबंधित बांधकामाचा अजब कारभार समोर आला आहे. अजब कारभार करणाऱ्यासंबंधित कंत्राट दारावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मोठा आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी दिला आहे.
रुग्णालयात एखाद्या रुग्णाला ऑपरेशन करताना जसे टाके मारले जातात अगदी त्याचप्रमाणे या सिमेंट काँक्रीट रस्त्याला ठीकठिकाणी टाके मारण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे संबंधित कंत्राटदाराच्या कामकाजावर विविध प्रश्न निर्माण होत आहे. सदर रस्ता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून तयार करण्यात आला असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. सार्वजनिक निधीतून तयार होणाऱ्या विकास कामांमध्ये असा हलगर्जीपणा व भ्रष्टाचार होत असेल तर हा गंभीर विषय असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

गडचिरोली -चामोर्शी या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते चक्क रस्त्यावर मारलेल्या टाक्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करून संबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा काँग्रेस तर्फे मोठा आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी दिला आहे.

