
नितेश गट्टीवार, गडचिरोली : दि. १९ मार्च
मराठी नववर्षाच्या मंगलमय वातावरणात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांची सदिच्छाभेट घेत, नववर्षाच्या शुभेच्छांसह जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा केली.
या भेटीदरम्यान खा. डॉ. नेते यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व नव्या वर्षात राज्य अधिक प्रगतीच्या मार्गावर जावे, तसेच सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, स्थानिक अडचणी आणि विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. विशेषतः दुर्गम भागांतील पायाभूत सुविधा, दर्जेदार रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आवश्यक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला.
यावेळी मा.खा.डॉ. नेते यांनी गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नाकडे मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले. शासनाच्या खरेदी केंद्रांवर धान विक्री करूनही अनेक शेतकऱ्यांचे चुकारे अद्याप प्रलंबित असल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी, पुढील हंगामाचे नियोजन करणे कठीण होत असून त्यांच्या उपजीविकेवरही परिणाम होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांचे सर्व प्रलंबित धान चुकारे तात्काळ अदा करण्यासाठी संबंधित विभागास निर्देश द्यावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
ही भेट केवळ औपचारिक न राहता गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. मराठी नववर्षाच्या शुभक्षणी झालेला हा संवाद जिल्ह्याच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे यांचीही उपस्थिती लाभली.

